02 January 2020

‍"हिशोब" CALCULATION OF LIFE


"हिशोब"


काळाच्या अनावर


वाहत्या ओघात


आपल्या आयुष्यातल्या काही वर्षाचा


हिशोब काय ठेवणार ?

 

आयुष्याने जर इतकं

अमर्याद दिलं आहे

तर मग जे मिळालं नाही

त्याचा हिशोब काय ठेवणार ?

 

सुहृदांनी दिला आहे


इतका स्नेह,इतकं प्रेम


तर शञूंच्या शञूत्वाचा


काय हिशोब ठेवणार ?

 

लख्ख्ं उजेडाचे


इतके दिवस आहेत इथे


तर राञींच्या अंधाराचे


काय हिशोब ठेवणार ?

 

आनंदाचे दोन क्षण


पुरेसे आहेत उमलण्याला


तर मग मनातल्या खिन्नतेचा


काय हिशोब ठेवणार ?

 

मधूर आठवणींच्या खूणा


इतक्या आहेत आयुष्यात


की थोड्याशा दु:खद गोष्टींचा


काय हिशोब ठेवणार ?

 

इतकी फुले मिळाली आहेत


काही जिवलगांकडून


काटे किती बोचले


याचा काय हिशोब ठेवणार ?

 

चंद्राचे चांदणे इतके


ह्दयंगम आहे की


त्यावर कलंक केवढा


याचा काय हिशोब ठेवणार ?

 

केवळ आठवणीनींच


अंत:करण पुलकित होत असेल


तर मग भेटलो न भेटलो


याचा हिशोब काय ठेवणार ?

 

काही ना काही नक्कीच


खूप छान आहे,प्रत्येकात


मग जरासे काही चुकले असेल तर


त्याचा काय हिशोब ठेवणार ? 

"हिशोब" various type of poem

No comments:

Post a Comment